पुणे: राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आता चारित्र्य पडताळणी हा टप्पा सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. विशेषतः शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2019 मधील गैरप्रकारात ज्यांची नावे समोर आली आहेत, अशा उमेदवारांना शिक्षणसेवक पदावर नियुक्ती दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद माकणे यांनी या संदर्भातील परिपत्रक शिक्षण आयुक्तांना जारी केले आहे. त्यानुसार, टीईटी 2019 गैरप्रकाराशी संबंधित तपासणी अहवालात ज्यांची नावे आहेत किंवा ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, अशा उमेदवारांची नियुक्ती थांबवली जाईल. दुसरीकडे, जर उमेदवारावर गुन्हा नोंदवलेला नसेल आणि त्याचे नाव सहआरोपी म्हणून आलेले नसेल, तर अशा उमेदवारांकडून नोटरी केलेले शपथपत्र सादर करून घेतल्यानंतरच नियुक्ती प्रक्रियेला मंजुरी दिली जाईल.

पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात टीईटी 2019 परीक्षेतील गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परीक्षार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता तब्बल 7,880 उमेदवारांनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचे उघड झाले. निकालात अपात्र असलेल्या उमेदवारांनी फसवणूक करून पात्र ठरल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी या सर्व उमेदवारांची यादी शिक्षण विभागाकडे सुपूर्द केली असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व उमेदवारांनी पुणे सायबर पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीचा अहवाल अनिवार्यपणे मिळवणे आवश्यक आहे. संबंधित नियुक्ती अधिकारी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करतील. जर एखाद्या उमेदवाराविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला असेल, तर अशा उमेदवाराला शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाणार नाही. मात्र, स्वच्छ अहवाल आल्यास उमेदवाराने शपथपत्र दाखल करूनच नियुक्ती मिळवावी लागणार आहे.
उमेदवारांवर भविष्यात गुन्हा दाखल झाल्यास किंवा त्यांचे नाव सहआरोपी म्हणून आले तर याबाबतची माहिती तातडीने शिक्षण आयुक्त आणि परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना देणे बंधनकारक असेल. याबाबत सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत.
टीईटी 2019 मधील या मोठ्या गैरप्रकारामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. निकालात अपात्र असलेले शेकडो उमेदवार गैरमार्गाने पात्र करून घेतल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले. यानंतर राज्य समितीत ठराव मंजूर करून संबंधित उमेदवारांविरुद्ध कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. आता शिक्षक भरती प्रक्रियेत कठोर पडताळणीच्या निर्णयामुळे गैरप्रकार करणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.







