Buldhana News : बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव येथे एक वेगळा प्रकार घडला आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सुटालपुरा भागात येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात एक व्यक्ती हुबेहूब श्री संत गजानन महाराज यांच्या वेशभूषेमध्ये अचानक प्रकट झाल्याने सर्वांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झाले. हुबेहूब वेशभूषा करणाऱ्या या कथित महाराजामुळे खामगावमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. ही व्यक्ती कोण आहे, कुठून आली, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. तर ‘खामगावात ‘गजानन महाराज’ प्रगटले’ म्हणत भाविकांनी (?) एकच गर्दी केली. अखेर गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी बोलवावे लागले पोलीस
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १ ऑक्टोंबरला रात्री साडे आठच्या सुमारास एक व्यक्ती सुटाळपुरा परिसरातील अशोक सातव यांच्या घरासमोर गजानन महाराजांची वेशभूषा करून आली. मला तुमच्या घरी भोजन करायचे आहे, अशी मागणी त्याने केली. (Buldhana News) सातव कुटुंबियांनी या व्यक्तीला जेवण दिले. या वेळी संबंधित व्यक्तीला शेजारच्यांनी पाहिले. सातव यांच्या घरात गजानन महाराज प्रगटले, असे त्यांना वाटले. त्यानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. कथित भाविकांनी सातव यांच्या घराकडे या व्यक्तीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. शेकडो लोक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत होते.
ही व्यक्ती कोण आहे? कुठून आली? याबाबत अद्यापही कुणाला माहिती नाही. त्यानंतर थोड्याच वेळात ही व्यक्ती निघून गेली. (Buldhana News) त्यानंतर खामगावच्या काही भागात गजानन महाराजांसारखी दिसणारी व्यक्ती दिसल्याची चर्चा शेगाव तालुक्यात होती. ही व्यक्ती बहुरूपी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत प्रतिक्रीया व्यक्त करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनायक होगाडे म्हणाले की, बुलढाण्यात गजानन महाराजांसारखी दिसणारी एक व्यक्ती आली असून, त्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये दाखविण्यात येत आहे. हाच मनुष्य २०१५ मध्ये इचलकरंजीतील गजानन महाराज मंदिरात येऊन बसला होता. त्यावेळी देखील एकाने मोठ्या भक्तीभावाने त्याला घरी आणला. तेथे तो चार-पाच दिवस राहिला. ऐश केली. लोकांनी त्याची आरती करण्यापासून ते त्याला अंघोळ घालण्यापर्यंत सगळे लाड याने पूर्ण करून घेतले. मला ही बातमी कळल्यावर मी पाहायला गेलो. (Buldhana News) महाराज गजानन महाराजांसारखे बसलेले, चिलीम ओढणारे, समोर भरपूर खायला ठेवलेले, फोटो, व्हिडिओ काढायला पूर्ण बंदी. कुणी काढायचा प्रयत्न केला तर तो ओरडायचा. त्यातही मी चोरून फोटो काढला होता, जो फोटो येथे देत आहे.
मी अंनिसचा कार्यकर्ता असल्याने, याबद्दल काय करायचे याची चर्चा केली; पण दुसऱ्याच दिवशी तो निघून गेला. काही दिवस गेले आणि पुन्हा अहमदनगरमध्ये हाच बाबा अशाच अवतारात दिसला. अहमदनगर अंनिस कार्यकर्ता कुणाला शिरसाठे यांना मी कळवले की, हाच बाबा आमच्याकडे आला होता. (Buldhana News) त्यावेळीही तो काही करायच्या आधीच असाच पसार झाला. त्यावेळी देखील मी माध्यमांना प्रतिक्रीया दिली होती. आता हाच बाबा पुन्हा बुलढाण्यात येऊन बसला आहे. ही याची मोड्स ओपरेंडी असावी. दोन्ही फोटो पाहिले असता लक्षात येईल, हा तोच भोंदू आहे. फक्त त्याला आणि त्याच्या भक्तांना याची पारख नाही. लोक मूर्ख बनवायलाच बसले आहेत. तुम्ही मूर्ख बना…
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Buldhana News : मोठी बातमी! मलकापूर-बुलढाणा एसटी बसला भीषण अपघात; ५५ प्रवाशांची बस घाटात उलटली!
Buldhana News : मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या महिलेवर ८ जणांकडून सामूहिक अत्याचार..