पुणे : महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप आणि आरपीआय आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलनं करत आहे.
मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. अनावधानाने हा प्रकार घडल्याचं सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली असली तरी यामुळे भाजप भलतंच आक्रमक झाला असून त्यांनी निषेध करत हा मुद्दा जोरदार लावून धरला आहे. भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटही आव्हाडांविरोधात असून गुरूवार सकाळपासूनच राज्यभरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे एकंदर वातावरण खूपच तापलेलं दिसत आहे. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून काही ठिकाणी आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलन
कालच्या या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील वातावरण खूपच तापलं. भाजप नेते, कार्यकर्ते यांच्याकडून राज्यातील विविध शहरांत आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, निषेधाच्या घोषणाही देण्यात येत आहेत. मुंबईत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वखाली मंत्रालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तर कोल्हापुरातही जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्यावतीने बिंदू चौकात निदर्शने करण्यात येत आहे. बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अभिवादन करत हे आंदोलन करण्यात येत आहे.
सांगलीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन झाले आहे. या आंदोलनात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ, आरपीआय नेते जगन्नाथ ठोकळे, राष्ट्रवादी पदाधिकारी जयश्री पाटील अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच अन्य ठिकाणी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. तर रत्नागिरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले आहे. आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.