पंढरपूर : वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहनिमित्त जालण्यातील एका महिला भाविकाने विठ्ठल रुक्मिणी चरणी जवळपास पावणे दोन कोटी रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांचे दान अर्पण करण्यात आले आहे. मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे या भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे. तसेच आजवरचे सर्वात मोठे दान अर्पण करण्यात आले आहे. या भाविकाने गुप्त दान म्हणून विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट, सोन्याचे विविध अलंकार, सोन्याच्या पाटल्या, मनी मंगळसूत्र आदी सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत.
विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहनिमित्ताने या भाविकाने रुखवत म्हणून चांदीचे ताट, वाट्या, तांब्या, आरसा, समय, असा विविध वस्तूसह रेशमी वस्त्र ही भेट दिली आहे. या दानामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीला सोन्याचे मुकुट, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला मोहोन माळ, रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले आहेत.
दरम्यान, याशिवाय देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या, भांडी, ताम्हण, पळी आणि देवाचा चांदीचा आरसा अशा किमती वस्तू देखील अर्पण केल्या आहेत.