बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. फरार असलेल्या आरोपींपैकी दोन आरोपी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर आता बीड पोलिसांनी मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणे यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, अपहरण झाले या दरम्याने त्याने देशमुख यांचे लोकेशन आरोपीला दिल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या अनुषंगाने सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
सिद्धार्थ सोनवणे पोलिसांच्या ताब्यात..
पोलिसांकडून सिद्धार्थ सोनवणेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांचा ठाव ठिकाणा आरोपींना सांगत होता, असा संशय पोलिसांना आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी देखील ताब्यात घेतले जात आहेत.
सिद्धार्थ सोनवणे आरोपींच्या संपर्कामध्ये?
सिद्धार्थ सोनवणे हा व्यक्ती मस्साजोग येथील रहिवासी असूमन संतोष देशमुख प्रकरणात सिद्धार्थ सोनवणे याचा या घटनेमध्ये हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली, यादरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कामध्ये सिद्धार्थ सोनवणे होता. त्याचबरोबर सिद्धार्थ सोनवणे याला पोलिसांनी धारूर मधून ताब्यात घेतला आहे. त्याची चौकशी देखील सुरू आहे, दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गावातील नागरिक आंदोलनाला बसले होते, रास्ता रोकोसाठी थांबले होते. त्यामध्ये सिद्धार्थ सोनवणे देखील सहभागी झाला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला आणि आज अखेर सिद्धार्थ सोनवणे याला धारूर मधून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, त्याची चौकशी सुरू आहे. यामध्ये काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले होते. या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी प्रमुख सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे लोकेशन पुरविणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली. सध्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.
अंत्यविधीला होता उपस्थित
दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थ सोनवणे याला लागली होती. घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला.