पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. जागावाटपावरून ठिकठिकाणी धुमश्चक्री सुरू असल्याचे चित्र आहे. यातच महायुतीमधील जागा वाटपाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असल्याचे चित्र आहे. अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या, मात्र अपेक्षित तोडगा निघत नसल्याने युतीच्या गोठात अस्वस्थता आहे. इच्छुक उमेदवार देखील अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत. आता या गहन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील मुख्य नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला अमित शाह देखील उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्रित महायुतीत निवडणूक लढवणार आहेत. या तीन पक्षांच्या एकत्रिकरणानंतर जागा वाटपाचा तिढा गंभीर होत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये उपस्थिती लावणार आहेत. विशेष म्हणजे ही अंतिम बैठक असून, त्यानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिने महायुतीची दिल्लीतील आजची बैठक महत्त्वाची समजली जात आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने शिवसेना आणि अजित पवारांनी अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण १० मतदारसंघावरून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिल्लीतील बैठकीकडे महायुतीच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.