अहमदनगर : नगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता ते जाहीर सभेत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यास अहमदनगरमध्ये विखे पाटील विरुद्ध लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत लंके काय घोषणा करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी चांगलाच धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
सुपा-अहमदनगरच्या मार्गावर निलेश लंके यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मार्गदर्शक, सभासद आणि हिंतचिंतकांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लंके या बैठकीत नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निलेश लंके यांच्या शरद पवार गटात प्रवेशासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे लंके कोणत्याही क्षणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास लंके यांना अहमदनगरची उमदेवारी दिली जाऊ शकते.
निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास तो अजित पवार यांच्यासाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. नगरला भाजपने सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. असे असताना शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी दिल्यास अहमदनगरमध्ये विखे पाटील विरुद्ध लंके अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लंके काय घोषणा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.