नागपूर : बेरोजगारपणा, तरूणांच्या अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली. नागपूरपर्यंत ही यात्रा दाखल होताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर रोहित पवार यांना ताब्यात घेण्यात आले.
नागपुरात सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. याच दरम्यान, विविध मागण्यांसाठी रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा काढली. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही जमले होते. जेव्हा ही यात्रा पुण्याहून नागपुरात आली तेव्हा ही यात्रा नागपूर पोलिसांनी अडवली. पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले. पण कार्यकर्त्यांकडून बॅरिकेट्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला गेला.
युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. विविध मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले. त्यामध्ये रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
मोर्चा झिरो माईल चौकात पोहोचताच पोलिस सतर्क
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकात पोहोचला. तेव्हा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. हे पाहून पोलिसही सतर्क झाले. पोलिसांनी रोहित पवार यांना अडवलं. त्यानंतर रोहित पवारांना उचलून पोलिस व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला.