मुंबई : राज्याच्या पोलीस दलात सरकारकडून मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, रजनीश सेठ यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्याचे एमपीएसीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे ०४ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली होती. या पदासाठी १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी अर्ज केला होता.
त्याचबरोबर एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांनी देखील अर्ज केले होते. मात्र, निवड समितीने रजनीश सेठ यांची निवड केली. यामुळे रजनीश सेठ यांचा एमपीएसीचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. शेठ यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनिुक्तीवर आहेत. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु झाली होती. या प्रकरणात शुक्ला यांच्यावर ही आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती.