जळगाव : भोसरी प्रकरण कोणी केलं, आपण काय संत आहेत का? आपलं बाळू आणि दुसऱ्याचं काळू असं कसं चालेल, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच तापले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील आता एकनाथ खडसेंवर टीकास्त्र सोडले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.
‘पहिले आपल्या जावयाला सोडवा ते कोणत्या कारणावरून जेलमध्ये आहेत. त्यांना बाहेर काढा, ते का साधूसंत आहेत म्हणून जेलमध्ये आहेत का? तर कृपया करून त्यांनी आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदेंवर आरोप करावा’ असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई होईल असे मला वाटत नाही, हे निगरगट्ट सरकार आहे. नैतिकतेच्या आधारावर उभे राहिलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं वाटत नाही. मात्र जोपर्यंत एकनाथ शिंदे राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही तो मागतच राहणार’ असे म्हणाले होते.