बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीनंतर शितोळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वकील हितेन वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली.
ऑगस्टमध्ये बदलापूर येथील शाळेच्या स्वच्छतागृहात चार ते पाच वर्षाच्या दोन मुलींवर एका परिचारिकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बदलापुरासह राज्यभरात रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान, अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल 12 तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला होता. यानंतर शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली.
तसेच या प्रकरणी लैगिंक अत्याचार प्रकरणात मारले गेलेले आरोपी आणि शाळेच्या विश्वस्तांविरुद्ध दोन आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे, असे हायकोर्टाला सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकातर्फे उपस्थित असलेले सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे आणि एसआयटी बरखास्त झाली आहे, असेही त्यांनी सांगितलं. यानंतर न्यायालयाने 19 डिसेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं.