मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ शिवा गौतम (वय-20) याला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश STF च्या संयुक्त कारवाईत रविवारी (दि.10) रोजी नानपरा बहराइच जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा शूटर शिवकुमार गौतम याने पोलीसांसमोर धक्कादायक मोठे खुलासे केले आहेत. शुभम लोणकरने स्नॅपचॅटच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याच्याशी अनेकवेळा चर्चा केली होती. तसेच, परदेशात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या सांगण्यावरुन त्याने बाबा सिद्दीकींना मारल्याचे शिवकुमारने चौकशीदरम्यान कबुल केले.
बाबा सिद्धिकी यांची हत्या झाल्यापासून शिवकुमार फरार होता. उत्तर प्रदेश आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शिवकुमारला अटक करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग या चार जणांना अटक केली आहे. यांनी शिवकुमारला आश्रय दिल्याबद्दल आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.