उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि तिला अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ‘फिरायला जाऊ’ असे सांगून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून भुलेश्वर मंदिराच्या घाटाच्या पायथ्याशी नेऊन लज्जा उत्पन्न कृत्य करण्यात आले. तसेच शरीरसंबंध ठेवण्यास तीव्र विरोध दर्शवल्याने चिडलेल्या संशयिताने अल्पवयीन मुलीला कंबरेच्या पट्ट्याने हातावर, पाठीवर, पायावर व मानेवर बदडून गंभीर दुखापत केली आहे. ही घटना बुधवारी (ता. 07) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जीवन राजू घोडके या नराधमाविरुद्ध पोक्सोसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी जीवन घोडके याने पीडित अल्पवयीन मुलीस “आपण फिरायला जाऊ” असे सांगून तिला जबरदस्तीने स्वतःच्या मोटारसायकलवर बसवले.

त्यानंतर तो तिला भुलेश्वर मंदिराच्या जवळ असलेल्या घाटाच्या पायथ्याशी घेऊन गेला. तेथे आरोपीने मुलीच्या अंगाशी मिठी मारून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

नकार देताच कंबरेच्या पट्ट्याने अमानुष मारहाण
पीडित अल्पवयीन मुलीने प्रसंगवधान राखत नराधम जीवन घोडके याच्या मागणीस व शरीरसंबंध ठेवण्यास ठामपणे नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने आपल्या कंबरेचा पट्टा काढून निष्पाप मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कंबरेच्या पट्ट्याने तिच्या हातावर, पाठीवर, पायावर आणि मानेवर मारहाण करून तिला गंभीर जखमी केले.
दरम्यान, जखमी अवस्थेत सुटका झाल्यानंतर पीडितेने घडलेला सर्व भयंकर प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.याप्रकरणी।आरोपी जीवन घोडके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2), 118(2), 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण ) कायदा कलम 8 व 12 अन्वये अपहरणाचा आणि बाललैंगिक शोषणाचा गंभीर गुन्हा नोंदवला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.







