बीड : बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीला जावई चक्क गाढवावर बसतो. तसेच त्याची गावभर मिरवणूकही निघते. या गोष्टीचा धसका घेऊन गावातील तब्बल २०० जावई फरार झाले आहेत. त्यांचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही. पण जावई शेर तर गावकरी सव्वाशेर आहेत. जावयाच्या शोधासाठी गावाने ‘जावई शोध समिती’ स्थापन केली आहे. त्यामुळे कोणत्या जावयांची गर्दभ सवारी निघणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
परंपरा कायम ठेवण्यासाठी धुळवडीच्या दोन दिवस अगोदर गावातील तरुण एकत्र येतात आणि जावई शोध समिती नेमतात. एका जावयाला ताब्यात घेऊन धुळवडीपर्यंत निगरानीखाली ठेवले जाते. तसेच धुळवडीच्या दिवशी त्यांची मिरवणूक गर्दभ महोदयांवर बसून मिरवणूक काढली जाते. पण ही मिरवणूक जावयांसाठी जितकी भीतीदायक आहे तितकीच जॅकपॉट लावणारी सुद्धा आहे.
धुळवडीच्या दिवशी सकाळी ग्रामपंचायतीसमोर गाढव आणला जातो. त्याला चपलेचा हार घातला की मिरवणुकीला सुरू होते. गावातील प्रमुख रस्त्यांवरून दुपारपर्यंत मिरवणूक हनुमान मंदिरासमोर पोहोचते. या ठिकाणी जॅकपॉट लागतो. पहिले म्हणजे लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेल्या कपड्यांचा आहेर गावातील प्रतिष्ठितांच्या हस्ते जावयाला दिला जातो. आणि दुसरे म्हणजे, जावईबापूला सासऱ्याच्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठीसुद्धा भेट दिली जाते.
दरम्यान, हे सगळं कितीही सुखावणारे असले तरी जावई फरार होतात. कारण गाढवावरून गावभर सवारी करणार कोण, असा प्रश्न जावयाच्या मनात असतो. या गोष्टीचा धसका घेऊन गावातील तब्बल २०० जावई फरार झाले आहेत.