-संतोष पवार
पळसदेव : शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने तब्बल 110 शिक्षकांची यादी जाहीर केली आहे.
प्राथमिक शिक्षक पुरस्काराच्या यादीत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन बेंडभर आणि कोंडवे धावडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका पल्लवी शिरोडे, आमोंडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका अलका उंडे यांचा समावेश आहे. तर माध्यमिक राज्य शिक्षक पुरस्कारासाठी पुण्यातील शिवाजीनगर येथील विद्या प्रसारणी सभेच्या भारत इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षिका सुनीता सपाटे आणि भोर तालुक्यातील आप्पासाहेब बांदल विद्यालय आळंदे शाळेतील शिक्षक रावसाहेब चौधरी यांना माध्यमिक शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
समाजाचे निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. राज्य शासनातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे सुधारित निकष करून 2021-22 पासून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली.
त्यानुसार राज्य शासनातर्फे अध्यादेश प्रसिद्ध करून 2023-24 साठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यात उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे सुध्दा जाहीर केली आहेत. प्रवर्गनिहाय शिक्षकांच्या पुरस्कारांची संख्या : प्राथमिक -38+1, माध्यमिक – 39, आदिवासी क्षेत्र (प्राथमिक) 19 , थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार – 8 , विशेष शिक्षक कला /क्रीडा – 2, दिव्यांग शिक्षक -1, स्काऊट गाईड -2, एकूण : 110 पुरस्कार ..