-संतोष पवार
पळसदेव : मराठा समाजाचा ‘एसईबीसी‘मध्ये (SEBC Reservation) समावेश झाल्यानंतरही, जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत असल्याचे बोलले जात होते. अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठा समाजातील लाडक्या बहिणींवर अन्याय होत असल्याच्या वृत्तपत्रातील बातम्या आणि समाजातील महिलांची नाराजी लक्षात घेऊन राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. SEBC चा समावेश होऊन नव्याने ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठा समाजातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यभरात विविध जिल्ह्यातील गावांसाठी 15 हजार जागांसाठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू होती. यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र, 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’ मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया जुन्या आदेशाप्रमाणे राबवली जात असल्याने मराठा समाजातून अन्यायाबाबत तीव्र आवाज उठवल्यानंतर राज्य शासनाने अंगणवाडी मदतनीस भरती प्रकिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाचे सहसचिव वि. रा. ठाकूर यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘एसईबीसी’ करिता गुणांकन व अन्य बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे. शासन स्तरावरील सर्व प्रक्रियेनंतर पुन्हा नव्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे म्हटले आहे.