पालघर : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अज्ञात महिलेने ५६ वर्षीय व्यक्तीची ७ लाख ३८ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील ५६ वर्षीय व्यक्तीला ११ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एका अज्ञात महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. गोड बोलून आणि विश्वास संपादन करून संबंधित महिलेने तक्रारदाराशी जवळीक निर्माण केली.

काही दिवसांनी तिने स्वतःला रशियातील नागरिक असल्याचे सांगत आपण भारतात आल्याची माहिती दिली. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रांमुळे आपल्याला अडवून ठेवल्याचा दावा तिने केला. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगून मदतीची विनंती केली.
तक्रारदाराने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिने दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण ७ लाख ३८ हजार ५०० रुपये ऑनलाइन हस्तांतरित केले. मात्र पैसे मिळाल्यानंतर संबंधित महिलेने अचानक सर्व संपर्क तोडला. तिचा मोबाईल आणि सोशल मीडिया खात्यांवरही संपर्क होणे बंद झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून बँक व्यवहार, मोबाईल क्रमांक आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर झालेल्या ओळखीवर सहज विश्वास ठेवू नये तसेच आर्थिक मदतीच्या नावाखाली पैसे मागितल्यास संबंधित व्यक्तीची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही रक्कम पाठवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.







