मुंबई: मासे खाताना घशात अडकलेला छोटासा काटा जीवघेणा ठरू शकतो, याची दोन धक्कादायक उदाहरणे नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात समोर आली आहेत. एका ५३ वर्षीय महिला आणि ६० वर्षीय पुरुषाच्या घशात माशाचे काटे खोलवर अडकल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र, डॉक्टरांनी वेळेत शस्त्रक्रिया करून दोघांनाही सुरक्षितपणे उपचार देत जीव वाचवला.

रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, गेल्या काही दिवसांत माशाचा काटा घशात अडकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा वेळी काटा घशातच राहिला किंवा मानेतील मऊ ऊतींमध्ये घुसला, तर गंभीर संसर्ग, पू होणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे अशा गुंतागुंती उद्भवू शकतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास परिस्थिती जीवघेणी ठरू शकते.

खोपोलीतील ५३ वर्षीय रोमा (नाव बदललेले) यांनी रात्रीच्या जेवणात मासे खाल्ले असताना त्यांच्या घशात माशाचा काटा अडकला. सुरुवातीला घशात वेदना आणि अन्न गिळताना त्रास होत होता. मात्र काही दिवसांत हा त्रास वाढत गेला आणि आठवडाभरानंतर त्यांना श्वास घेण्यासही अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणीदरम्यान सुरुवातीला व्हिडिओ लॅरिंगोस्कोपीमध्ये घशाच्या उजव्या बाजूला सूज दिसली, मात्र काटा दिसून आला नाही. त्यानंतर सीईसीटी स्कॅन करण्यात आला. या तपासणीत काटा घशातून बाहेर सरकून मानेतील हायॉइड हाडाजवळील मऊ ऊतींमध्ये खोलवर अडकल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी संसर्ग होऊन पू साचला होता.
दरम्यान, रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्यांना श्वास घेण्याचा त्रास वाढला आणि तपासणीत हृदयविकाराचा झटका आल्याचेही निष्पन्न झाले. अँजिओग्राफीमध्ये हृदयातील अनेक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. एकीकडे हृदयावरील उपचार आवश्यक होते, तर दुसरीकडे काटा काढण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करणेही गरजेचे होते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून उपचाराचे नियोजन करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान मानेतील सूज आणि संसर्गामुळे काटा शोधणे कठीण जात होते. त्यामुळे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने काट्याचे अचूक स्थान निश्चित करण्यात आले आणि तो सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. सुमारे एका तासाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. त्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यावर टप्प्याटप्प्याने अँजिओप्लास्टी करून हृदयातील दोन रक्तवाहिन्यांवरही यशस्वी उपचार करण्यात आले. उपचारानंतर महिला पूर्णपणे बऱ्या होऊन घरी परतल्या.
दुसऱ्या घटनेत पनवेलमधील ६० वर्षीय शिक्षक नरेश (नाव बदललेले) यांच्या घशातही मासे खाताना काटा अडकला. काटा खाली जावा या उद्देशाने त्यांनी भाताचा गोळा आणि केळे खाल्ले. मात्र त्यानंतरही त्रास कायम राहिल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी योग्य तपासणी करून त्यांच्यावरही यशस्वी उपचार केले.
डॉक्टरांनी नागरिकांना इशारा देताना सांगितले की, घशात माशाचा काटा अडकल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते आणि रुग्णाचा जीवही वाचवता येतो.






