सांगली : विधानसभा निवडणुकीकांची रणधुमाळी सुरु झाली असून आता प्रचाराची रेलचेल सुरु झाली आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच महायुती व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. मात्र, महायुतीच्या प्रचारसभेत रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन त्यांनी टीका केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला.
बुधवारी सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी आपल्या भाषणात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. विशेष म्हणजे, मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित होते.
“ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही,” असा शब्दात अजित पवारांनी सुनावले आहे.
सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले…
शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे…मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी…असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी आपली क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी, असे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 6, 2024