छत्रपती संभाजी नगर : ऐका हो ऐका… शेतकऱ्यांचे सरकार म्हणविणाऱ्यांनो ऐका… विहिर मंजुरीसाठी गट विकास अधिकारी, इंजीनीअर, ग्रामसेवक प्रत्येकी १५ हजार रूपये मागतोय, मग १५ हजार रूपये देतो. गावात किती विहिरी, त्या बदल्यात २ लाख रूपये देतो. पण माय बाप सरकारने गरिबांच्या विहीरी मंजूर करावी. विहिरी मंजूर झाल्या नाहित तर शेतकरी नागड होऊन बसणार? असे म्हणत फुलंब्री तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात सरपंच मंगेश साबळे यांनी दोन लाख रूपये उधळत थेट प्रशासनाला सवाल करत शेतकऱ्यांची बाजू मांडली. या प्रकरणामुळे लाचलुचपत खाते व प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैगा येथील शेतकऱ्यांच्या विहिरी मंजुरी प्रकरण
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैगा येथील शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी पैशाची मागणी करत आहेत. विहिरी मंजूर होत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अखेर या प्रश्नाला वाचा फुटावी यासाठी सरपंच मंगेश साबळे यांनी प्रत्येक विहिरी साठी १० हजार रूपये असे दोन लाख रूपये फुलंब्रे पंचायत समितीच्या आवारात उधळले. हे पैसे उधळत असताना शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर होत नसल्याची तक्रार त्यांनी मांडली आहे. गटविकास अधिकारी लाच मागणी करत असल्याचे सांगत या बाबत चा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
एका विहीरीच्या मंजुरीसाठी गटविकास अधिकारी मॅडम १५ हजार रुपये मागतात, इस्टिमेटसाठी इंजिनिअरकडून १५ हजार मागितले जातात, ग्रामरोजगार सेवक १५ हजार मागतो. एवढे पैसे शेतकरी आणणार कुठून? विहीरीसाठी शासन चार लाख रुपये अनुदान देतं खरं, परंतु हे लोक लाख-दीड लाख रुपये पगारी घेऊनही लाच मागतात. मी गोरगरीब शेतकऱ्यांची कामं करतो. आज मी २० विहिरींच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपये देतो पण कामं करा, असा आक्रोश करत सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीच्या आवारात अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला.
दरम्यान, सरपंच मंगेश साबळे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याकडून १० हजार रुपये विहीर मंजुरीसाठी आणले आहेत. हे पैसे घेऊन त्यांनी विहिरी मंजूर कराव्यात. जर मंजुऱ्या दिल्या नाहीत तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना नागडं बसवणार असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांसमोर भीक मागण्याचा इशारा या व्हीडिओ व्दारे साबळे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना सरपंच मंगेश साबळे म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहेत. परंतु फुलंब्रीच्या गटविकास अधिकारी लाचेची मागणी करतात. गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नाहीये, असा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना गट विकास अधिकारी ज्योती कवडदेवी म्हणाल्या की, सरपंच मंगेश साबळे यांची व्हीडिओ क्लिप बदनामीकारक आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही पैशांची मागणी त्यांच्याकडे केलेली नाही. त्यांच्या गावातील विहिरींचे प्रकरण प्रोसेसमध्ये आहे, त्यांना मंजुरी मिळेल. आम्ही व्हायरल व्हीडिओप्रकरणी फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली आहे.