पुणे : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला. एकीकडे शेतकरी संकटात असताना त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळातून जोरदार टीकेची झोड उठली. यानंतर अखेर आता माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, माझ्या कालच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो. मी मस्करीमध्ये बोललो. मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान-सन्मान दुखावला असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कालदेखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या माणिकराव कोकाटे यांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले, कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीत एका रुपयांची तरी गुंतवणूक आहे का? तसेच शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” माणिकराव कोकाटे यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही. त्यामुळे माफीच्या प्रतिक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर अर्थिक संकट आले आहे. त्यातच कृषिमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले. अखेर त्यांनी मी मस्करी मध्ये बोललो असल्याचं म्हणत दिलगिरी व्यक्त केली.