पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आता रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर बाजूने टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर आता शहरातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांचे ऑडीट करावे अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. या प्रकरणानंतर रुग्णालयाची धर्मादायुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने चाैकशी केली. रुग्णालयाकडे सुमारे 35 कोटी 48 लाख रुपये शिल्लक आहेत, ही धक्कादायक माहिती चौकशी अहवालात ही समोर आली. या प्रकरणानंतर आता शहरातील सर्व धर्मादाय रुग्णालयावर शंका उपस्थित केली जात आहे.याबाबत आता युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात 57 धर्माधाय रुग्णालय असून, यापैकी अपवाद वगळता गोरगरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, हे अनेकवेळा समोर आले आहे. तसेच चौकशीतून रुग्णालय प्रशासनाने सुमारे 38 कोटी रुपयांचा निधी खर्च केला नाही हे समोर देखील आले आहे. विशेष म्हणजे धर्मादाय रुग्णालयांना संपूर्ण निधी वर्षभराच्या आत खर्च करणे आवश्यक असते. आता जिल्ह्यातील सर्व रुग्णालांची ऑडिट झालं पाहिजे, त्यातून अनेक धक्कादायक प्रकार समोर येऊ शकतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
सध्या खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयांकडून आपत्कालिन परिस्थिती उपचार सुरू करण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी करण्यात येते. ही अत्यंत चुकीची पद्धत असून त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. डिपॉझिट भरले नाही तर रुग्णाला उपचार नाकारणे ही गंभीर चूक आहे. असे घडू नये म्हणून सरकारने महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये तशी तरतूद करावी, अशी मागणी देखील सर्व स्तरातून होत आहे.