Accident मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही बस निघाली होती, यावेळी हा अपघात झाला आहे. सदर घटनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत अपघातात मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मृतांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की…!
‘मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सर्व जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालय व एमजीएम हॉस्पिटल येथे तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी स्थानिक प्रशासन समन्वय ठेवून आहेत. जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी राज्य सरकार सातत्याने संपर्कात आहे. दरीतील बस बाहेर काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकार या कुटुंबियांच्या पाठीशी आहे.’
या खाजगी बसमध्ये बाजीप्रभू ढोल पथक, गोरेगाव (मुंबई) येथील सदस्य होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली आहे.