दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध जंतर-मंतर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य आंदोलनापूर्वीच प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह प्रमुख सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतले. मात्र, प्रमुख नेत्यांची पकडधड झाल्यामुळे ऐनवेळी आंदोलनाचे नेतृत्व आता लातूरच्या तरुणाकडे जाणार आहे.

अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, सर्व मुख्य नेत्यांच्या अनुपस्थितीत आता महाराष्ट्रातील तरुण नेते अजिंक्य शिंदे या संपूर्ण आंदोलनाची धुरा सांभाळतील. अजिंक्य शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. त्यांनी आपले शालेय आणि उच्च शिक्षण ग्रामीण भागातूनच पूर्ण केले आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी आयटी (IT) क्षेत्रात काही काळ नोकरी केली होती. यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीचे संयोजक म्हणूनही कार्य केले आहे.

सध्या अजिंक्य शिंदे यांच्याकडे कॉकरोच जनता पक्षाच्या ‘राष्ट्रीय संघटन प्रभारी’ पदाची जबाबदारी असून, ते पक्षाचे मुख्य रणनीतीकार मानले जातात. संघटन वाढवण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडणारे अजिंक्य हे अभिजीत दिपके यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र आहेत. सध्या ते दिल्लीतच उपस्थित असल्याने, वरिष्ठ नेत्यांना अटक झाल्यानंतर आता त्यांच्याच नेतृत्वाखाली जंतर-मंतर येथील आंदोलन पार पडणार आहे.

दरम्यान ध्रुव राठी आणि तुषार गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर सीजेपी संघटनेने अत्यंत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.







