हिंगोली : जिल्ह्यातील तलाठी संतोष देवराम पवार यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज (29 ऑगस्टला) राज्यभरातील तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांनी कामबंदची हाक दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आप्पा डुबल यांनी दिली आहे. तलाठ्यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
तलाठी (आडगाव रंजे, तालुका वसमत जिल्हा हिंगोली) येथील कार्यरत तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हॉट्सअॅप चॅटवरुन झालेल्या वादातून हि घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रताप कराळे असं आरोपीचे नाव आहे.
तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत असताना आरोपी प्रताप कराळे या तरुणाने कार्यालयात जात व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजवरुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तलाठी पवार म्हणाले “मी योग्यच टाकले जे टाकले आहे”, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळेने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिरचीची पूड टाकत चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तलाठ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरातील तलाठी संवर्गात संतापाची लाट उसळली आहे.
तलाठी संघटनेची मागणी
तलाठी संतोष पवार हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आलेले आहे. त्यामुळे शासनाने पवार यांना शहीद कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा व तात्काळ शासनाने तसे घोषीत करावे. तसेच पवार यांना निवृत्ती होण्याच्या दिनांकापर्यंत मिळणारे वेतन व लाभ हे त्यांच्या कुटुंबियांना लागु करावेत. तसेच तलाठी पवार यांची केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस कठोर शिक्षा देऊन त्यांचे कुटुंबास न्याय द्यावा.
सुधीर गिरमे, सरचिटणीस पुणे जिल्हा तलाठी संघटना : हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार आजच्या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत.