अहमदनगर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना कडाडून विरोध केला आहे. मी एकवेळ महायुतीतून बाहेर पडेन पण माघार घेणार नाही, असं कडू म्हणाले आहेत. अमरावतीनंतर बच्चू कडू अहमदनगरच्या रुपात महायुतीला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. ते अहमदनगरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या मागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता आहे. लंके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास हे महायुतीविरोधात काम करत आहेत, असा अर्थ आहे. त्यामुळे कडू महायुतीची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ३० मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कडू यांनी सूचक विधान केले आहे.
बच्चू कडू यांनी शनिवारी (ता. ३०) छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाल की, अहमदनगर मतदारसंघातील कार्यकर्ते सांगत आहे की आम्हाला भरपूर त्रास झाला आहे. काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत. त्यामुळे हा सगळा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावे लागणार आहे. स्थानिक राजकारणात विखे घराण्याला विरोध आहे. त्यामुळेच कदाचित लंके चांगले आहेत, असे मला कार्यकर्ते सांगत आहेत.
बच्चू कडू यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. अहमदनगरमध्ये कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची फारशी ताकद नाही. त्यामुळे अहमदनगरमध्ये कडू यांचे कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बच्चू कडू यांनी लंके यांना पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र त्यांनी लंके यांना पाठिंबा दिल्यास हा एकप्रकारे महायुतीला धक्काच असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, कडू यांच्या भूमिकेमुळे नवनीत राणा विरोधी भूमिकेमुळे राणा यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तर अहमदनगरमध्ये कडू यांनी लंके यांना पाठिंबा दिल्यास तेथील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.