सोलापूर : ऐन संकटाच्या वेळेस आपल्याला आपला मित्रच मदत करीत असतो, असा प्रत्यय आपल्याला सर्वांनाच आलाच असेल. परंतु, याचे मूर्तिमंत उदाहरण सोलापूर जिल्ह्यात घडले आहे. अत्यवस्थ मित्राच्या उपचारासाठी मुंबईहून थेट एअर अॅम्ब्युलन्स सोलापुरात मागविली, मित्राला तातडीने मुंबईत उपचारासाठी दाखल केले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व संचालक यांच्या मैत्रीची सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरु आहे.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील व कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे (जळोली. ता पंढरपूर) हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. नरसाळे यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोलापूरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नरसाळे यांच्या विविध तपासण्या केल्यानंतर त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रियाही केली. त्यानंतरही नरसाळे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हत्या. उलट शस्त्रक्रियेनंतर पोटात जंतूसंसर्ग वाढू लागला होता.
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी वेळ न दवडता निर्णय घेतला आणि मुंबईला हलविण्याचे ठरवले. त्यांनी मुबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार स्वतःच निर्णय घेत मुंबईतून एअर अॅम्ब्युलन्स मागवली.आणि दत्तात्रेय नरसाळे यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमधून सोमवारी दुपारी ४ वाजता एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई येथे दाखल केले.
दरम्यान, अभिजीत पाटील व दत्तात्रय नरसाळे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. तसेच सोलापूरात थेट एअर अॅम्ब्युलन्स मागवून मित्राला उपचारासाठी मुंबईत दाखल केले आहे. अभिजीत पाटील यांनी मित्रासाठी केलेली मदतीची धावाधावीची चर्चा सध्या सोशल मिडीयावर जोरदार सुरु आहे.
अभिजीत पाटील यासंदर्भात सोशल मिडीयावर पोस्ट करून म्हणाले, ‘मित्रासाठी कोणतंही दिव्य पार करू, मात्र मित्राचा जीव वाचला पाहिजे. त्याला उत्तम स्वास्थ्य लाभलेच पाहिजे. उपचार सुरू केले आहेत. ते लवकर आजारातून बरे होतील. हा मला विश्वास वाटतो,’