पुणे : व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी घरच्यांना न सांगता गोव्यात गेलेल्या एका प्रेमीयुगुलाचा गोव्यातील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हे प्रेमीयुगुल मुळचे उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. ही घटना दक्षिण गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली आहे.
विभू शर्मा (२७), सुप्रिया दुबे (२६) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमीयुगुल उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. व्हॅलेंटाईनच्या आधीच ते गोव्यात आले होते. ते दोघे गोव्यातल्या व्हिसिनीटी रिसॉर्टवर थांबले होते. पालोलेम बिचवर रात्रीचे जेवण आणि कॉकटेल घेतल्यानंतर ते दोघे समुद्रात पोहायला गेले होते. त्यानंतर दोघेही समुद्रात बुडाले.
दरम्यान, प्रेमीयुगुल बुडत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही किना-यावर आणले. पोलिसांना चैकशी दरम्यान माहिती मिळाली की, दोघांच्याही घरच्यांना ते गोव्याला आले असल्याची माहिती नव्हती. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.