उस्मानाबाद : गावाच्या उरुसात अचानकपणे वळू उधळल्याने १४ भाविक चेंगराचेंगरीत जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ०८) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उस्मानाबाद येथील प्रसिद्ध सुफी संत हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा ७१८ वा उरूस सुरू आहे. रात्री ठीक अडीच वाजता धार्मिक विधी कार्यक्रम चरागा सुरू होता. या वेळी २० ते २५ हजार भाविक उपस्थित होते. अनेक भाविक उरुसात सहभागी झाले होते. अशातच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चरागा पाहण्यासाठी बसलेल्या ठिकाणी एक वळू अचानक भाविकांमध्ये घुसला.
अचानक वळू गर्दीत घुसल्यानं भाविक भयभीत झालेच, पण वळूही घाबरुन सैरावैरा पळू लागला. वळू उधळल्याने सर्व भाविक भयभीत होऊन पळू लागले. गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, १४ भाविक या घटनेत जखमी झाले आहेत. तर यापैकी काही भाविकांना गंभीर दुखापतही झालेली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले. तसेच, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी काही जणांवर उपचार सुरु आहेत. तर काहीजण उपचार घेऊन घरी परतले आहेत.