मुंबई : राजकीय वातावरणात एक मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालथी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.
लोकसभा निकालानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात, अशी माहिती आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्याने सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे.
लोकसभेच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचं गणित बदललं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहेत. ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या जागांवरील गणित बदलणार असल्याचं दिसत आहे. मुंबईत एकूण 36 विधानसभेच्या जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 20 जागा, तर महायुतीला 16 जागांवर विजय मिळाला आहे. याचा परिणाम आता शिंदे गटावर होताना दिसत आहे.
शिंदे गटाचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी फेटाळला आहे. त्यांनी कोणतेही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात नाही, असे सांगितले आहे.