लहू चव्हाण
पाचगणी : Mahabaleshwar News : राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्रात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रासाठी तब्बल ३ कोटी ४३ लाखाचा शासकीय निधी मंजुर झाला आहे. आमदार मकरंद पाटील यांनी तीन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला आज अखेर यश आले आहे. (Mahabaleshwar News)
आमदार मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान असून तालुक्यात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. शासकीय पातळीवरून स्ट्रॉबेरीपासून विविध उपपदार्थांची निर्मिती करण्याबाबत स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा. यासाठी तालुक्यात संशोधन केंद्र असावे अशी कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती. या अनुषंगाने जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या गेली तीन वर्षांच्या पाठपुराव्यामुळे अखेर यश आले आहे.
स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांना दिलासा मिळाला असून परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन जातींची रोपे व या रोपांवर संशोधन करुन लागवडीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.
यावेळी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना आमदार मकरंद पाटील म्हणाले कि, आपल्याकडे स्ट्रॉबेरी फळांवर सखोल संशोधन झाले नाही. या संशोधन केंद्रामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीपासून उत्पादनातही मोठा फरक पडेल. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पन्न वाढेल तसेच जिल्ह्यातील अनुकूल भागातही स्ट्रॉबेरी पीक घेता येईल. असे पाटील यांनी सांगितले आहे.