रायगड : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशातच अलिबाग समुद्रात एक जहाज भरकटल्याची घटना घडली आहे. हे जहाज धरमतूर येथून जयगडला दिशेने निघाले होते. अलिबागजवळ समुद्रात काल (दि. 25 जुलै) भरकटले होते. यामधील 14 क्रू मेंबर्सना आज (दि.26 जुलै) कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन करुन त्यांना लिफ्ट करुन वाचवण्यात आले आहे.
हे जहाज खराब हवामान, सोसाट्याचा वारा आणि दृष्यमानता कमी असल्यामुळे भरकटले. आज सकाळी नऊच्या सुमारास बचावकार्य राबवण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करुन सर्व 14 क्रु मेंबर्सना वाचवण्यात आले आहे. शिवाय त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता ते मेडिकली फिट असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला तो पुणे जिल्ह्याला. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. यानंतर दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेताच पाण्याचा निचरा होऊ लागला आणि जनजीवन सुरळीत होऊ लागले.