Politics : मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेंनी केला आहे. तसेच वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी केले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे देखील नाव लिहले आहे. वाझेंच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
१०० कोटी रूपयांचा हिशोब कुठेच नाही : सुप्रिया सुळे
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “या पत्राची आणि नावाची वेळ पाहा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कशा या गोष्टी कशा बाहेर आल्या. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाबाबत न्यायालयात जी केस सुरू आहे, त्यामध्ये एकही आरोप सिध्द झालेला नाही. सगळं खोटं ठरलेलं आहे. १०० कोटी रूपयांचा हिशोब कुठेच नाही. हे आरोप खूप बालिश आहेत. राज्याचं राजकारण गलिच्छ झालेलं आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, धोरणं, महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही कधीच कोणावर आरोप केले नाहीत. आरोप केलेले ते शंभर कोटी कुठे आहेत. मग आरोप खोटा ठरला ना, ज्यांनी देशमुखांवर आरोप केले ते आज कुठे आहेत? असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
संजय राऊत, संजय भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना त्यांनी किती त्रास दिला, ते मी पाहिलं आहे, आजचं राजकारण खूप गलिच्छ झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर आलं आहे. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं असाही सवाल यावेळी सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.
सचिन वाझे हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्यावर सध्या मनसूख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवल्याचा आरोप असून प्रकरणात सध्या ते तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप करण्यात आले. परमबीर सिंग यांनी देखील देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. आता वाझे यांनी देशमुखांबद्दल भाष्य करत ते म्हणाले कि, देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे. तसेच देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणामध्ये मागील वर्षी एप्रिल महिन्यात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक करण्यात आली होती.