कर्नाटक : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर देऊन काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं म्हणत भाजपवर ‘ऑपरेशन लोटस’च्या तयारीचा आरोप कर्नाटकातील मांड्या येथील काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी केले आहेत. तसेच एकही आमदार त्याच्या झाळ्यात अडकणार नसून राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे रविकुमार गौडा म्हणाले.
काय म्हणाले रविकुमार गौडा?
मी आजही म्हणत आहे की, भाजपने आता 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. दोन दिवसापूर्वी कोणीतरी फोन करून 100 कोटी रुपये तयार असल्याचे सांगितले होते. त्यांना 50 आमदार खरेदी करायचे आहेत. भाजपचे लोक 50 कोटींवरून 100 कोटींवर गेले आहेत. ते म्हणाले, मला कोणीतरी फोन केला होता, मी त्याला म्हणालो 100 कोटी रुपये आपल्याकडेच ठेवा. मी ईडीकडे तक्रार करण्याचा विचार केला आहे. ते सातत्याने आमचे सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आमचे सरकार स्थिर असून मुख्यमंत्रीही मजबूत आहेत, असं रविकुमार गौडा म्हणाले.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही रविकुमार गौडा यांनी असाच दावा केला होता. एका चमूने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 4 आमदारांसोबत संपर्क साधण्यात आला होता. याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, असा दावा गौडा यांनी केला होता. मात्र, 136 आमदार असलेले काँग्रेस सरकार मजबूत असून राज्याचे मुख्यमंत्री गरिबांचे हितचिंतक असून त्यांना कोणीही हटवू शकत नाही, असा दावा रविकुमार गौडा यांनी केला आहे.