नाशिक : कांद्याचे पीक घ्यायला जितका खर्च शेतकऱ्यांना आला आहे. तितका बेसिक खर्च सुद्धा भरून निघत नसल्यामुळे व कांद्याला हमीभावच मिळत नसल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्याने सोमवारी (ता. ०६) सकाळी अकरा वाजता दीड एकारावरील कांद्याची होळी केली आहे.
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याची होळी पेटवलेली आहे. या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केल्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. अखेर आजच्या होळीच्या दिवशी सरकारच्या धोरणाला वैतागून या शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याला अग्निडाग दिला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नसल्याचे सांगत शेतकऱ्याने व्यथा मांडली. गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात मोठी घसरण झाल्याने जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत आहे.
दरम्यान, सरकारने नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी त्याबाबत शेतकरी फार समाधानी नाही. परिणामी शेतकऱ्यांचा केंद्र आणि राज्य सरकारांवर रोष आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा दरांतील सततच्या घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे.
कृष्णा डोंगरे नामक या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून सरकारी अनास्थेचा निषेध नोंदवला आहे.