हरारे: भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात रोमांचक सामन्याने झाली आहे. उभय संघांमधील मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाला. हा सामना कमी धावसंख्येचा होता, जिथे दोन्ही संघांचे फलंदाज धावांसाठी धडपडताना दिसले. त्यामुळे टीम इंडियाला 13 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. बीसीसीआयने या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एक युवा संघ या दौऱ्यावर आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करत झिम्बॉब्वेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. प्रथम फलंदाजी करताना झिम्बॉब्वे संघ 20 षटके खेळू शकला आणि 9 गडी गमावून केवळ 115 धावाच करू शकला. झिम्बाब्वेकडून क्लाईव्ह मदंडेने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. तर डिऑन मायर्सने 23 धावांचे योगदान दिले. ब्रायन जॉन बेनेटनेही 15 चेंडूत 22 धावा केल्या. दुसरीकडे टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 2 आणि मुकेश कुमार-आवेश खान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली
या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाची फलंदाजी सुरुवातीपासूनच खराब झाली. पॉवर प्लेमध्येच टीम इंडियाने 4 विकेट गमावल्या आणि त्यानंतर या सुरुवातीच्या धक्क्यातून एकही फलंदाज सावरू शकला नाही. त्यामुळे 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ 102 धावाच करू शकला. टीम इंडियाकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 31 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला झिम्बॉब्वेविरुद्ध टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा पराभव स्वीकारावा लागला.
पदार्पण करणारे तिन्ही खेळाडू स्वस्तात बाद झाले
या सामन्यात अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रायन पराग यांनी टीम इंडियासाठी टी-20 पदार्पण केले. पण एकही फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. अभिषेक शर्माने 4 चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता विकेट गमावली. यानंतर रियान परागही पदार्पणाच्या सामन्यात विशेष काही करू शकला नाही. या सामन्यात रियान परागने 3 चेंडूत केवळ 2 धावा केल्या. तर ध्रुव जुरेलने 14 चेंडूंचा सामना करत 1 चौकाराच्या मदतीने केवळ 6 धावा केल्या.