हैदराबाद: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करत सामन्यावर कब्जा केला. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात भारताला मोठा फटका बसला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल बाद झाला. यामुळे सामन्याचा दिवस खूपच रोमांचक झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी अनिल कुंबळे म्हणाले की, इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करावी लागेल. कुंबळेचे म्हणणे गांभीर्याने घेत इंग्लिश गोलंदाज पुनरागमन करणार असल्याचे दिसत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबाद येथे खेळवली जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला 246 धावांत गुंडाळले. भारतीय गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही आपले कौशल्य दाखवून दिले. विशेषतः यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने 70 चेंडूत 76 धावा केल्या होत्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या 246 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने एका विकेटवर 119 धावा केल्या होत्या.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रूटने गोलंदाजीला सुरुवात केली. जो रुटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून जैस्वालने आक्रमक फलंदाजी करणार असल्याचे संकेत दिले. मात्र, जो रूटने यशस्वी जैस्वालला पुन्हा ही संधी दिली नाही आणि षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. जैस्वालने 74 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार मारले.