विशाखापट्टणम: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या केली आहे. विशाखापट्टणम येथील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जैस्वालने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कर्णधार रोहित शर्मासह डावखुरा फलंदाज जैस्वाल सलामीला आला. त्याने कमालीचा संयम दाखवला. जेम्स अँडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजाचा जयस्वालने धैर्याने सामना केला. दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस जैस्वालच्या नावावर होता. पहिल्या दिवसाचा संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 6 विकेट गमावत 336 धावा केल्या होत्या. जैस्वाल 257 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 179 धावा करत नाबाद आहे, तर दुसऱ्या बाजूने आर अश्विन त्याला साथ देत आहे.
यशस्वी जैस्वालने यापूर्वी हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले होते. 22 वर्षीय जैस्वालने 89 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तर 151 चेंडूत शतक झळकावले. यशस्वीने 224 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. त्याने रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या तर शुभमन गिलसोबत 49 धावांची भागीदारी केली. श्रेयस अय्यरसह यशस्वीने 90 धावांची भर घातली. रजत पाटीदारसोबत यशस्वीने चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलसह त्याने 52 धावा जोडल्या तर केएस भरतसोबत सहाव्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या.
गिल आणि श्रेयसने केली निराशा
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित 41 चेंडूत 14 धावा करून बाद झाला, तर शुभमन गिलचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. गिल 46 चेंडूत 34 धावा करून बाद झाला, तर श्रेयस अय्यरही सतत फ्लॉप होत आहे. श्रेयस 59 चेंडूत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पदार्पण करणारा रजत पाटीदार 72 चेंडूत 32 धावा करून बाद झाला तर अक्षर पटेलने 51 चेंडूत 27 धावा केल्या. यष्टिरक्षक केएस भरत 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडकडून नवोदित फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2, तर जेम्स अँडरसनने एक विकेट घेतली.