दुबई: भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आसमान दाखवणाऱ्या न्यूझीलंडला जोरदार धक्का बसला आहे. इंग्लंडविरोधातील खाईस्टचर्च कसोटीत षटकांच्या धिम्या गतीबद्दल न्यूझीलंडला तीन गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परिणामी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेत चौथ्यावरून पाचव्या स्थानावर घसरण होऊन अंतिम फेरीत दाखल होण्याच्या आशांना धक्का बसला आहे.
आयसीसी प्रसिद्धीपत्रकातून म्हणते, पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्यांच्या स्पर्धेला नवे वळण लागले आहे. कारण, ख्राईस्टचर्च कसोटीत न्यूझीलंड आणि इंग्लंडला षटकांच्या धिम्या गतीबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. उभय संघांतील खेळाडूंच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कापण्यात आली असून आयसीसी डब्ल्यूटीसी स्पर्धेतील तीन गुण कापण्यात आले आहेत. तीन महत्त्वाचे गुण गमावणे न्यूझीलंडला मोठा धक्का देणारे असून त्यांची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने नियमित कालावधीत तीन षटके कमी टाकली. यामुळे ‘प्रत्येक षटकानुसार आयसीसीने नियमाअधिन दंड ठोठावला.
ख्राईस्टचर्च कसोटीनंतर न्यूझीलंडच्या खात्यातील टक्केवारी ४७.९२ आहे. डरबन कसोटीत श्रीलंकेचा २३३ धावांनी धुव्वा उडवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने (५९. २६ टक्के) गुणतालिकेत द्वितीय स्थानावर झेप घेत ऑस्ट्रेलियाला (५७.२६ टक्के) तिसऱ्या स्थानावर ढकलले. श्रीलंकन संघ (५० टक्के) चौथ्या स्थानावर उभा आहे. भारतीय संघ ६१.११ टक्केवारीने गुणतालिकेत अग्रस्थानावर विराजमान आहे. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील बॉर्डर गावसकर करंडकमधील उर्वरित चारही लढती जिंकाव्या लागतील.