अहमदाबाद: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने सहज पराभव केला. सुरुवातीला गोलंदाजांनी प्रभावी मारा करत पाकिस्तानला अवघ्या191 धावांत रोखले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून पार केले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. त्याशिवाय मध्यल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक केले. विश्वचषकातील भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा सलग आठवा विजय आहे. तर २०२३ च्या विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिला पराभव आहे.
पाकिस्तानने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने एकदम वादळी सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. भारताची पहिली विकेट गिल याच्या रूपाने पडली. गिल याने चार चौकारांच्या मदतीने 16 धावांची खेळी केली. त्याला शाहीन आफ्रिदीने बाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरला. परंतु, दोघांची जोडी जमली असे वाटत असतानाच कोहलीला हसन अलीने बाद केले. विराट कोहलीने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या.
रोहित शर्मा मात्र एका बाजूने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतच होता. रोहितने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली. यामध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरने केएल राहुलच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.अय्यरने 62 चेंडूमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची खेळी केली. केएल राहुल याने दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 19 धावांचे योगदान दिले.