IND vs AUS Final: अहमदाबाद: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन हे ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे नायक ठरले. विजेतेपदाच्या लढतीत 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या 47 धावांत तीन विकेट गमावल्या. यानंतर हेडने 120 चेंडूत 137 आणि लॅबुशेनने 58 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात एकही भारतीय गोलंदाज प्रभावी दिसला नाही. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये बुमराह आणि शमीने भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण नंतर दोघेही निष्प्रभ ठरले.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने 47 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्याच्या विकेटनंतर विराट वगळता टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली.
सलामीवीर शुभमन गिलला दुहेरी आकडाही पार करता आला नाही. याशिवाय गेल्या सामन्यात शतक झळकावणारा श्रेयस अय्यरही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. अय्यर अवघ्या 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्यानंतर केएल राहुलने संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. राहुलने 107 चेंडूत 66 धावांची अत्यंत संथ खेळी साकारली, ज्यात फक्त एक चौकार समाविष्ट होता. या खेळीमुळे भारताने कसा तरी 240 धावांचा टप्पा गाठला आणि संपूर्ण जबाबदारी भारतीय गोलंदाजांच्या खांद्यावर आली.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात १५ धावा काढत दमदार सुरुवात केली. यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने 3 महत्त्वाच्या फलंदाजांचे बळी घेत कांगारू बॅकफूटवर ढकलले. बुमराहने मार्श आणि स्मिथची विकेट घेतली, तर शमीने वॉर्नरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पण ट्रॅव्हिस हेड भारत आणि ट्रॉफीमध्ये भिंतीसारखा उभा राहिला. त्याने 120 चेंडूत 130 धावांची मॅचविनिंग इनिंग साकारली. दुसऱ्या टोकाला मार्नस लॅबुशेनने आपल्या समंजस खेळीने टीम इंडियाला अडचणीत आणले. दोन्ही फलंदाजांसमोर बुमराह, शमी आणि जडेजासह भारताची सर्व शक्ती अपयशी ठरल्याचे दिसत होते.
अंतिम सामना भारताच्या अपेक्षेच्या विरुद्ध ठरला. अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंना वेळेत विकेट मिळाल्या नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने 241 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि विश्वचषकात नवा इतिहास रचला. भारताचा विजयरथ रोखून कांगारू संघाने सहावी ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून सामना जिंकला. कांगारू संघाने 2003 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये अशाच पद्धतीने भारताचा पराभव केला होता.