पुणे प्राईम न्यूज: विश्वचषक 2023 स्पर्धेला अहमदाबादमध्ये सुरूवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हे दोन्ही संघ गेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्यावेळी इंग्लंडने जेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा ही स्पर्धा होणार आहे. भारतातील 10 शहरांमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये 10 संघातील 150 खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रिकेटचा हा महाकुंभ पाहण्यासाठी जगभरातून चाहते येणार आहेत. चला, तर मग वर्ल्ड कपशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टीजाणून घेऊयात
सामने कुठे खेळले जातील ?
वर्ल्ड कप 2023 चा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. यासह 10 मैदानांवर सामने खेळवले जातील. यामध्ये हैदराबादचे राजीव गांधी स्टेडियम, धरमशालाचे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, लखनौचे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम, पुण्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, एम. चिन्नास्वामी स्टेडियम यांचा समावेश आहे. तसेच मुंबईचे वानखेडे स्टेडियम आणि कोलकाताचे ईडन गार्डन यांचा देखील समावेश आहे.
विश्वचषक 2023 मध्ये 150 खेळाडू सहभागी
आयसीसीने विश्वचषकासाठी प्रत्येक संघाला जास्तीत जास्त १५ खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यावेळी भारताबरोबरच दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ विश्वचषकात सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीपूर्वीचा शेवटचा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
विश्वचषक 2019 मध्ये कोण होता विजेता
वर्ल्ड कप 2019 चा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. पण सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. त्यामुळे चौकार मोजण्याच्या नियमानुसार इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. मात्र, आयसीसीने आता चौकार मोजणीचा नियम रद्द केला आहे.
विश्वचषक 2023 चे अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने कोठे खेळवले जातील?
वर्ल्डकपचा सलामीचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल .
भारत-पाकिस्तान सामना कधी होणार?
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे, जो 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. यानंतर अफगाणिस्तानशी लढत आहे. हा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.