मुंबई : मुंबई इंडियन्सबद्दल सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मुंबई इंडियन्सला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कप्तापदावरुन बाजूला करुन हार्दिक पांड्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबईला त्यांच्या लौकिकाप्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. तसेच फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून हटवल्याने चाहते नाराज झाले असून हार्दिकवर जोरदार टीका करत आहेत.
सोशल मीडियावर त्याचा राग काढून शेरेबाजी करत आहेत. हार्दिक पांड्याबद्दल प्रेक्षकांकडून करण्यात आलेली शेरेबाजी चर्चेत असताना आज नवी चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्मा हे आयपीएल संपल्यानंतर मुंबई इंडियन्सची साथ सोडणार, अशा चर्चा सुरु होत्या. अशातच आता मुंबई इंडियन्सचे आणखी दोन खेळाडू या आयपीएलनंतर संघाची साथ सोडतील अशा चर्चा सुरु आहेत. दरम्यान, या केवळ चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात कोणतिही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचं नेतृत्त्व करत आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात खेळत आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत 2011 पासून मुंबई इंडियन्सच्या संघात खेळत आहे. मुंबईनं 2011 मध्ये रोहितला 9.2 कोटी खर्च करुन संघात घेतलं होतं. रोहित त्यापूर्वी डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता.
रोहितनंतर या दोन खेळाडूंची नाव चर्चेत
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 201 मॅचमध्ये 5110 धावा केल्या आहेत. रोहितनं मुंबईला पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. मात्र, मुंबईच्या मॅनेजमेंटनं भविष्याचा विचार करुन यंदा टीमचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे दिल्याचं सांगितलं गेलं. दरम्यान, रोहित शर्मा यंदाचं आयपीएल संपल्यानंतर मुंबईची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांमध्ये जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या नावाची भर पडली आहे. रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. तर, सूर्यकुमार यादव नऊ वर्षांपासून आणि जसप्रीत बुमराह बारा वर्षांपासून मुंबईकडून खेळत आहे.