मुंबई : टी -२० विश्व करंडक स्पर्धेच्या आजच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड व पाकिस्तान हे दोन संघ भिडणार असून विजयी होणाऱ्या संघाला उद्या होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्या लढतीतील विजेत्यासोबत अंतिम लढतीत दोन हात करावे लागणार आहेत.
मात्र आजच्या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागणार आहे.सिडनी येथील मैदानावर आजचा सामना खेळविण्यात येणार आहे. सुपर १२ मध्ये चोकर्स दक्षिण आफ्रिका पराभूत झाल्याने पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली होती.
ग्रुप २ मध्ये खेळताना पाकिस्तान संघाने ५ लढतीमध्ये ३ लढती जिकून ६ गुणांची कमाई केली होती. तर न्यूझीलंडने ग्रुप १ मध्ये खेळताना ५ पैकी ३ विजय, १ अनिर्णित व १ हार पत्कारली होती. पावसामुळे न्यूझीलंडची एक लढत अनिर्णित असल्याने त्या लढतीचा एक गुण मिळवत न्यूझीलंड ग्रुप क्रमवारीत अव्वल ठरला होता.
आजच्या लढतीत पाकिस्तान संघाची मदार कर्णधार बाबर आझम, शान मसूद, शाहीन आफ़्रिदी व निशाम शहा यांच्यावर असणार आहे. न्यूझीलंड संघ कर्णधार केन विल्यमसन, मार्टिन गुप्टिल यांच्या बरोबरीने अनुभवी ट्रेंड बोल्ट, टीम साऊदी यांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ वाटत असले तरी मध्यल्या फळीतील फलंदाजी हा दोन्ही संघांसाठी डोकेदुखी ठरली आहे.आज सिडनी येथील हवामान स्वच्छ असल्याने ही लढत क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे, हे निश्चित. या लढतीतील विजेता संघ अंतिम लढत मेलबर्न येथील मैदानावर भारत व इंग्लंड यांच्यातील विजेत्यासोबत खेळणार आहे.