पुणे : टी२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीची दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विजय खेचून आणला.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ४ धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.
भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. त्याला हार्दिक पांड्याची देखील साथ मिळाली.
दरम्यान, अष्टपैलू पांड्याने तीन गडी बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला.