मुंबई: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या खेळण्यावर अजूनही प्रश्न कायम आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये विराट कोहली निवडीसाठी उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली होती.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहलीला टीम इंडियात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी विराट कोहलीने माघार घेतली. विराट कोहली संघाबाहेर का आहे, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बीसीसीआयचे म्हणणे आहे की, विराट कोहलीने गोपनीयतेचा हवाला दिला आहे आणि त्याचे मत पूर्ण विचारात घेतले जात आहे. मात्र, माघार घेण्यापूर्वी विराट कोहलीने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली होती. कोणीही विराट कोहली संघात नसण्याचे कारण कोणीही स्पष्ट केलेले नाही.
विराट कोहली जबरदस्त फॉर्मात
विराट कोहली न खेळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही विराट कोहली खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने खूप धावा केल्या. सध्या टीम इंडियाला मधल्या फळीत विराट कोहलीची उणीव भासत आहे. विराट कोहलीशिवाय 100 कसोटी खेळण्याचा अनुभव असलेला एकही खेळाडू संघात नाही.