नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. लीग स्टेजमधील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विश्वचषकात टीम इंडिया हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इतर तीनही संघांना भारताने पराभूत केले आहे. यंदाच्या मोसमात विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट चांगलीच तळपत आहे. पण, गेल्या तीन उपांत्य फेरीतील त्याची कामगिरी निराशाजनक आहे.
भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी अशी राहिली आहे की, कोणताही प्रतिस्पर्धी संघ त्यांच्यासमोर टिकू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा वरच्या फळीत जोरदार आक्रमण करतो, तर मधल्या फळीत विराट कोहली गोलंदाजांची ताकदच हिरावून घेतो. या दोन्ही भारतीय दिग्गजांचा या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. विराट कोहलीने दोन शतके झळकावली असून सध्या तो अव्वल स्थानावर आहे.
उपांत्य फेरीत विराटची मोठी अडचण :
गेल्या सलग तीन आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. हा दिग्गज 2011, 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. गेल्या वेळी विराटला केवळ 1 धाव करता आली. तेव्हा न्यूझीलंडविरुद्ध पराभूत होऊन भारताला बाहेर पडावे लागले होते. 2015 मध्येही त्याने फक्त 1 धाव केली होती, तर 201९ मध्ये विराट 9 धावा करून बाद झाला होता.
विराटसमोर कोणाचे आव्हान असणार?
गेल्या तीनही विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत विराट कोहलीसाठी खूप वाईट गेले. पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या पहिल्या मेगा सेमीफायनलमध्ये त्याला वहाब रियाझने 9 धावांवर बाद केले. 2015 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिचेल जॉन्सनकडून त्याला 1 धावांवर माघारी पाठवण्यात आले होते, तर गेल्या वेळी तो न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर केवळ 1 धाव करू शकला होता. या तिन्ही प्रसंगी विराट कोहलीची विकेट डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली. यावेळीही उपांत्य फेरीत ट्रेंट बोल्टचा सामना होईल. ही कमजोरी दूर करून या दिग्गजांना सावधपणे पुढे जावे लागेल.