चेन्नई: IPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. जवळपास दोन महिन्यांनंतर फलंदाजी करणाऱ्या कोहलीने आयपीएल हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्याच सामन्यात ही कामगिरी केली. सहावी धाव पूर्ण करताच त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या. यासह विराटने वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि शोएब मलिक यांच्या खास क्लबमध्येही स्थान मिळवले आहे. आरसीबीच्या डावाच्या 7व्या षटकात रवींद्र जडेजाच्या पाचव्या चेंडूवर एकेरी घेत कोहलीने ही कामगिरी केली.
विराट कोहली T20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा आकडा गाठणारा जगातील सहावा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. IPL 2024 च्या पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने 376 सामन्यात 11994 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने 463 टी-20 सामन्यांमध्ये 14562 धावा केल्या आहेत, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक 542 सामन्यांमध्ये 13360 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड 660 सामन्यांमध्ये 12900 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर ॲलेक्स हेल्स 446 सामन्यांमध्ये 12319 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.