नवी दिल्ली: अखेर तो दिवस आला, ज्याची भारतीय क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण जग वाट पाहत होते. वर्ल्ड कप 2023 मध्ये बुधवारी न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने (virat Kohli) त्याचे बहुप्रतिक्षित 50 वे एकदिवसीय शतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने मोठी कामगिरी करून सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत ज्याला स्पर्श करणे जवळजवळ अशक्य मानले जात होते, तो सचिनचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विशेष म्हणजे हा विक्रम मोडण्यासाठी विराटने मुंबईचे वानखेडे स्टेडियम, महान सचिनचे होम ग्राउंड आणि मास्टर ब्लास्टरच्या पदार्पणाची तारीख निवडली. सचिनने 34 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराटने डावाच्या 42 व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर दोन धावा घेत आपले ‘रेकॉर्डब्रेक’ शतक पूर्ण केले. मैदानावर उपस्थित सचिन तेंडुलकरही त्याच्या या कामगिरीवर खूप खूश होता. यादरम्यान त्याने 106 चेंडूंचा सामना करत आठ चौकार आणि एक षटकार मारला. चार वर्षांपूर्वी विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीत विराट न्यूझीलंडविरुद्ध फक्त 1 धावा करून बाद झाला होता. त्याची भरपाई त्याने याच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध उपांत्य फेरीत शतक ठोकून केली.
बुधवारी या खेळीदरम्यान विराटने सचिनचा आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात सर्वाधिक 673 धावा केल्या होत्या, हा विक्रमही विराटने मोडला.
सर्वात जास्त एकदिवसीय शतक करणारे अव्वल ५ फलंदाज
विराट कोहली (भारत): 50
सचिन तेंडुलकर (भारत): 49
रोहित शर्मा (भारत): 31
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया): 30
सनथ जयसूर्या (श्रीलंका): 28