पॅरिस: विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 50 किलो वजनी गटात, विनेशने उपांत्य फेरीत 5-0 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आणि यासह तिला पदक निश्चित झाले. तसेच अंतिम फेरीत पोहचणारी पहिली भारतीय महिला आहे. मात्र, यादरम्यान विनेशने 1-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला विनेशने सलग 2-2 गुण मिळवत 5-0 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या 29 वर्षीय विनेशने मंगळवार 6 ऑगस्ट रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि तिचे पदार्पण स्फोटक ठरले. तिच्या पहिल्याच सामन्यात विनेशने सध्याची ऑलिम्पिक आणि 4 वेळा विश्वविजेती जपानची युई सुसाकी हिचा पराभव करून खळबळ उडवून दिली. विनेशच्या या विजयाची कोणालाही अपेक्षा नव्हती, कारण 25 वर्षीय सुसाकीने तिच्या 82 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही सामना गमावला नव्हता. हा तिचा पहिला पराभव होता. यानंतर विनेशने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा 7-5 असा पराभव केला.
या निकालानंतर आता बुधवारी, 7 ऑगस्टच्या रात्री अंतिम सामना होणार आहे. विनेश फोगटने 2016 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते, पण पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे तिला बाहेर पडावे लागले होते. यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपूर्वीच तिचा पराभव झाला होता. आता पॅरिसमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करून ती ऑलिम्पिक उपांत्य फेरी गाठणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली.